श्रीराम मंदिरातील दान चोरी निंदनीय; दोषींना कठोर शिक्षा व्हावी – दत्तात्रेय होसबळे



नवी दिल्ली | ३ जुलै २०२६ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह श्री. दत्तात्रेय होसबळे यांनी अयोध्येतील श्रीरामलला मंदिरातील दानपेट्यांमधील रकमेच्या चोरीच्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, त्यामुळे संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धेला आणि रामभक्तांच्या भावनांना मोठा धक्का बसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रसिद्धीपत्रकानुसार, श्रीराम जन्मभूमीवर उभारलेले भव्य मंदिर हे पिढ्यान्पिढ्यांच्या संघर्ष, त्याग, समर्पण आणि कोट्यवधी रामभक्तांच्या बलिदानाचे प्रतीक असून संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धेचे केंद्र आहे.

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाच्या विनंतीनंतर उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून, त्याच्या शिफारशींनुसार कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे होसबळे यांनी नमूद केले.



त्यांनी पुढे म्हटले की, मंदिराच्या व्यवस्थापनातील आणि संचालनातील त्रुटी दूर करून अधिक पारदर्शक, सक्षम आणि विश्वासार्ह व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रभावी पावले उचलली जावीत. त्यामुळे कोट्यवधी रामभक्तांची श्रद्धा आणि विश्वास अधिक दृढ राहील तसेच सध्या निर्माण झालेला संभ्रमही दूर होईल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदू समाजाला संयम आणि धैर्य राखण्याचे आवाहन करत म्हटले आहे की, या दुर्दैवी घटनेचा गैरफायदा घेऊन हिंदू धर्म आणि समाजाला बदनाम करण्याचे प्रयत्न करणाऱ्या हिंदूविरोधी व राष्ट्रविरोधी शक्तींचे कथित षडयंत्र हाणून पाडण्यासाठी समाजाने सजग राहावे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने